माढा : राजकारणात प्रवेश करण्यासाठी वयाची किमान मर्यादा निश्चित आहे; मात्र राजकीय पदावरून निवृत्त होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. याच मुद्द्यावरून प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी राजकीय नेत्यांना ६० वर्षांनंतर निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे.
माढा तालुक्यातील अंजनगाव येथे आयोजित कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराजांनी राजकीय नेत्यांच्या वाढत्या वयाचा आणि तरुणांना मिळणाऱ्या संधींचा मुद्दा उपस्थित केला. ‘पुढाऱ्यांनी ६० वर्षांनंतर थांबायला हवे आणि राजीनामा द्यायला हवा,’ असे त्यांनी म्हटले.
राजकारणात प्रवेशासाठी १८, २१ आणि २५ वर्षे अशा वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा लागू असते. मात्र, राजकीय पदावर राहण्यासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित नसल्याने अनेक नेते दीर्घकाळ महत्त्वाच्या पदांवर कायम राहतात. यामुळे तरुणांना नेतृत्वाची संधी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, याकडे इंदुरीकर महाराजांनी लक्ष वेधले.
सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय निश्चित असते. मात्र, राजकारणात अशी कोणतीही मर्यादा नसल्याने अनेक ज्येष्ठ नेते ८० ते ९० वर्षांपर्यंत सक्रिय राजकारणात राहतात. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातही निवृत्तीचे वय असावे, असे मत इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केले.
वय वाढत गेल्यानंतर माणसाच्या बौद्धिक क्षमतेत घट होत असल्याचे मत मांडताना त्यांनी राजकीय नेत्यांवरही भाष्य केले. वयाची मर्यादा निश्चित करून ज्येष्ठ नेत्यांनी बाजूला व्हावे आणि नव्या पिढीला नेतृत्वाची संधी द्यावी, असा त्यांच्या वक्तव्याचा सूर होता.
इंदुरीकर महाराज आपल्या खास शैलीतील कीर्तन आणि सामाजिक विषयांवरील परखड भाष्यामुळे चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांमध्ये अनेकदा राजकारण, समाजव्यवस्था आणि तरुणांच्या प्रश्नांचा संदर्भ असतो. अंजनगाव येथील कीर्तनातील त्यांचे हे वक्तव्य आता समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांकडून किंवा विविध पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष लागले आहे.