Skip to content
Menu

MPSC आंदोलनात सातपैकी तिघांचे उपोषण मागे; प्रकृती खालावल्याने निर्णय

October 9, 2026
महाराष्ट्र

पुणे : पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा शुक्रवारी नववा दिवस आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात बेमुदत उपोषण करणाऱ्या सात विद्यार्थ्यांपैकी तिघांनी मध्यरात्री उपोषण मागे घेतले. प्रकृती खालावल्याने आणि किडनीवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके अशी उपोषण सोडलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. ज्येष्ठ मंडळींनी केलेल्या आवाहनानंतर तसेच प्रकृतीची चिंता लक्षात घेऊन त्यांनी उपोषण थांबवले. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते दूध घेऊन तिघांनी उपोषणाची सांगता केली. मात्र, उर्वरित चार विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच राहणार आहे.

विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी कायम

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. तिघांनी उपोषण मागे घेतले असले, तरी अध्यक्षांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कायम असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे पोलिसांचे आदेश

दरम्यान, एस. एम. जोशी पूल आणि पत्रकार भवन परिसरातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून, आंदोलनस्थळ तातडीने रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यायी ठिकाणी आंदोलनासाठी परवानगी मागितल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर नियोजित आंदोलन स्थगित करण्याबाबत विद्यार्थ्यांकडून पत्र देण्यात आले होते. त्यामुळे पूर्वीची आंदोलनाची परवानगी रद्द करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे.