Skip to content
Menu

लातुरात इलेक्ट्रिकल दुकानाला भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

October 5, 2026
महाराष्ट्र

लातूर : शहरातील मध्यवर्ती आणि गजबजलेल्या गांधी मार्केट परिसरातील इलेक्ट्रिकल दुकानाला रविवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत दुकानातील इलेक्ट्रिकल वस्तू आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद झाल्यानंतर सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दुकानातून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. काही वेळातच आगीने मोठे रूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीच्या विळख्यात सापडले.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी लातूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविले. त्यानंतर अग्निशमन दलाचे चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुकानातील साहित्य मोठ्या प्रमाणात ज्वलनशील असल्याने आग विझविताना जवानांना मोठी कसरत करावी लागली.

मध्यरात्री १२.३० ते १.१५ वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे परिसरातील अन्य दुकानांना आग लागण्याचा धोका टळला.

दरम्यान, लातूर शहरात गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात स्क्रॅप मार्केट परिसरातही मोठी आग लागली होती. त्यानंतर आता गांधी मार्केटमधील इलेक्ट्रिकल दुकानाला आग लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेत झालेल्या नुकसानीचा अंतिम आकडा संबंधितांकडून निश्चित केला जाणार आहे.