मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणारे आदिवासी विद्यार्थी मुंबईत दाखल होण्याच्या तयारीत असतानाच, रात्रीच्या सुमारास त्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटेतच रोखण्यात आल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला आहे.
नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानुसार विद्यार्थी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.
दरम्यान, रात्रीच्या सुमारास विद्यार्थ्यांना पोलिसांनी अडवल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांची बसही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच अडवणूक झाल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
आदिवासी विकास मंत्री, आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
वसतिगृहातील सुविधा, भोजन व्यवस्था, विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आदिवासी विकास मंत्री आणि आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
मुंबईत आंदोलनासाठी परवानगी मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर त्यांनी ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली.
वडेट्टीवारांनी काय म्हटले?
विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या घटनेवर प्रश्न उपस्थित केला आहे. आदिवासी विद्यार्थी आपल्या मागण्या मांडण्यासाठी आझाद मैदानाकडे येत असताना त्यांना रात्री ३ वाजता वाटेतच अडवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले, ‘केसेस करू’ अशी धमकी देण्यात आली आणि त्यांची बस ताब्यात घेण्यात आल्याचे आरोप असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी पोलिसी कारवाई का केली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकाव्यात आणि विद्यार्थ्यांवरील दडपशाही थांबवावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.