चंदीगड : भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची कामगिरी करत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) लडाखमधील न्योमा येथे स्वदेशी ‘मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम’ची (एमसीपीएस) यशस्वी चाचणी घेतली. तब्बल २२ हजार फूट उंचीवरून जवानांनी उडी घेत ही चाचणी पूर्ण केली. विशेष म्हणजे, उणे १५ अंश सेल्सिअस तापमान आणि अत्यंत प्रतिकूल हवामानात ही चाचणी पार पडली.
न्योमा येथील ड्रॉप झोन हा जगातील सर्वाधिक उंचीवरील ड्रॉप झोनपैकी एक आहे. या ठिकाणी यापूर्वीही भारतीय लष्कराकडून जवान, वाहने आणि युद्धसामग्री पॅरा-ड्रॉप करण्याच्या विविध मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. नुकतेच भारतीय हवाई दलानेही न्योमा येथे लढाऊ विमानांच्या संचालनासाठी उंचावरील हवाईतळ कार्यान्वित केला आहे.
२२ हजार फुटांवरून उडी, १३,७०० फुटांवर सुरक्षित लँडिंग
चाचणीदरम्यान जवानांनी २२ हजार फूट उंचीवरून उडी घेतली. सुमारे २० हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडण्यात आले. त्यानंतर जवानांनी नियंत्रित पद्धतीने खाली येत १३,७०० फूट उंचीवर सुरक्षित लँडिंग केले.
डीआरडीओने ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, विंग कमांडर राहुल झा, एमडब्ल्यूओ आर. जे. सिंग (व्हीएम-जी) आणि एमडब्ल्यूओ विवेक तिवारी यांनी या चाचणीत यशस्वी सहभाग घेतला.
गोठवणाऱ्या थंडीत प्रणालीची क्षमता सिद्ध
या चाचणीचे वैशिष्ट्य म्हणजे उणे १५ अंश सेल्सिअस तापमानात पॅराशूट प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. अत्यंत उंची, कमी तापमान आणि प्रतिकूल वातावरणात ‘एमसीपीएस’ने अपेक्षित कामगिरी केल्याने तिची विश्वासार्हता आणि रणनीतिक उपयुक्तता सिद्ध झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे.
पॅराशूटसह ऑक्सिजन यंत्रणाही स्वदेशी
चाचणीदरम्यान जवानांनी स्वदेशी ‘पॅरा कॉम्प्युटर’, अत्याधुनिक ऑक्सिजन प्रणाली आणि विशेष जम्पसूटचाही वापर केला. या सर्व प्रणालींच्या मदतीने अत्यंत उंचीवर सुरक्षित पॅराशूट ऑपरेशन पार पाडण्यात आले.
‘मिलिटरी कॉम्बॅट पॅराशूट सिस्टीम’ विकसित करण्यामध्ये आग्रा येथील एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ADRDE) आणि बंगळूर येथील डिफेन्स बायोइंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी (DEBEL) यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. या यशामुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षमतेत आणखी भर पडली आहे.