Skip to content
Menu

कानपूरमध्ये प्रशिक्षण विमानाचा भीषण अपघात; पायलटसह प्रशिक्षणार्थीचा मृत्यू

August 27, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय

कानपूरमध्ये प्रशिक्षण विमानाचा भीषण अपघात; पायलटसह प्रशिक्षणार्थीचा मृत्यू

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी सकाळी प्रशिक्षण विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात पायलट आणि प्रशिक्षणार्थीचा मृत्यू झाला. गंगा बॅरेजजवळील नत्थापूरवा गावाच्या परिसरात हा अपघात घडला. विमान हवेत असतानाच अचानक त्याचा तोल बिघडला आणि काही क्षणांत ते खाली कोसळले.

मिळालेल्या माहितीनुसार, चकेरी येथील गर्ग एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरमधून चार आसनी प्रशिक्षण विमानाने सकाळी साडेअकराच्या सुमारास उड्डाण केले होते. सुमारे २० मिनिटांनी, उड्डाणाच्या ठिकाणापासून जवळपास ३९ किलोमीटर अंतरावर विमान दुर्घटनाग्रस्त झाले.

हवेतच बिघडले संतुलन

अपघाताच्या वेळी विमान सुमारे १०० फूट उंचीवर होते. अचानक विमान डगमगू लागल्याने त्याचा ताबा सुटला. त्यानंतर विमान झाडांना धडकत जमिनीवर आदळले. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे पावणेबारा वाजता पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने दोन्ही जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पायलट ३ हजार तासांचा अनुभवी

मृतांमध्ये पायलट सचिन भाटिया (गुजरात) आणि प्रशिक्षणार्थी अभिषेक पुजारी (कर्नाटक) यांचा समावेश आहे. सचिन भाटिया यांना जवळपास ३ हजार तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातानंतर विमानाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला आहे. कॉकपिटच्या परिसरात पायलट अडकल्याचे, तर विमानाची सीट तुटून बाहेर पडल्याचे घटनास्थळावरील दृश्यांमधून दिसून येत आहे.

अपघाताच्या कारणांचा तपास सुरू

कानपूर पोलीस आयुक्त रघुबीर लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती DGCA ला देण्यात आली आहे. विमान दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला की अन्य काही कारण होते, याचा तपास आता DGCAच्या पथकाकडून करण्यात येणार आहे.

दरम्यान, दुर्घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये विमान कोसळल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अवशेष पसरल्याचे दिसत आहे.