पुणे : विविध मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या १४ दिवसांपासून सुरू आहे. काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले असून, मागण्यांबाबत सरकारकडून ठोस आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
मात्र, यावेळी नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. “खाऊन-पिऊन आंदोलन करा. मीदेखील चोरून खायचो आणि आंदोलन करायचो,” असे झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्याचे समोर आले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचे झिरवाळांना थेट प्रत्युत्तर
झिरवाळ यांच्या वक्तव्यावर विद्यार्थ्यांनीही तातडीने प्रतिक्रिया दिली. “आम्हाला खाऊन-पिऊन आंदोलन करायचे असते तर तुम्ही इथे आलेच नसते,” असे विद्यार्थ्यांनी सुनावले. आपल्या मागण्यांसाठी विद्यार्थी गंभीरपणे उपोषण करत असून, सरकारकडून लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वक्तव्यामुळे चर्चा सुरू असतानाच आंदोलनस्थळी काही काळ वातावरण तणावपूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.
१४ मागण्यांसाठी आंदोलन
आदिवासी विद्यार्थ्यांकडून विविध १४ मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. मागण्यांवर सरकारकडून लेखी जीआर मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. सलग १४ दिवस आंदोलन सुरू असल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृतीही खालावल्याची माहिती समोर आली आहे.
पाच तास विद्यार्थ्यांसोबत चर्चा
दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी १५ सदस्यीय विद्यार्थी शिष्टमंडळासोबत तब्बल पाच तास चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले असले तरी उपोषणावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी काही तांत्रिक बाबींचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगत उईके यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
मात्र, मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर विद्यार्थी ठाम आहेत. “आमची मुलं आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत, याचा मला अभिमान आहे,” असे अशोक उईके यांनी चर्चेनंतर म्हटले.