Skip to content
Menu

राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आंदोलन

September 2, 2026
मुख्य बातम्या

नाशिक : काँग्रेसने नारी वंदन विधेयकाला विरोध केल्याचा आरोप करत भाजपने राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळ्या फिती लावून आणि काळे कपडे परिधान करून निषेध आंदोलन केले. यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका काय?’

नारी वंदन विधेयकाच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या असलेल्या विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्याचा आरोप करत भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

आंदोलनादरम्यान काही महिला पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी एका महिला पदाधिकाऱ्याने, ‘आधी तुमच्या बहिणीला तुम्ही राजकारणात पुढे आणा,’ अशी टीका केली.

राहुल गांधी नाशिकमध्ये येत असतानाच भाजपने आंदोलन केल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राहुल गांधींच्या ताफ्याला खड्ड्यांचा अडथळा

दरम्यान, राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्यात शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दाही समोर आला. नाशिक विमानतळावरून काँग्रेसच्या शिबिराच्या ठिकाणी जात असताना त्यांचा ताफा म्हसरूळ-मखमलाबाद परिसरातून गेला. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने ताफ्याला अडचणींचा सामना करावा लागला.

रस्त्यांच्या या अवस्थेवरून नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत असून, शहरातील पायाभूत सुविधांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

नाशिकमध्ये काँग्रेस-भाजप आमनेसामने

एकीकडे राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसचे शिबिर आणि विविध कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे भाजपने नारी वंदन विधेयकाच्या मुद्द्यावरून आंदोलन छेडले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे.

महिला आरक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राहुल गांधींच्या नाशिक दौऱ्यात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.