नवी दिल्ली : आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार, याकडे देशभरातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः फिटमेंट फॅक्टर किती निश्चित केला जाणार, यावर नव्या वेतनरचनेचे गणित अवलंबून राहणार आहे.
केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून फिटमेंट फॅक्टर ३.६१ ते ४.०० दरम्यान ठेवण्याची मागणी केली जात आहे. सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर २.७५ होता. त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार ७ हजार रुपयांवरून थेट १८ हजार रुपये करण्यात आला होता.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर हा सध्याच्या बेसिक पगाराला गुणून नवीन बेसिक पगार निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे. त्यामुळे आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती ठेवला जातो, यावर कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतनाची मोठ्या प्रमाणात गणना होणार आहे.
महागाई आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना वास्तविक पगारवाढ मिळावी, यासाठी फिटमेंट फॅक्टर महत्त्वाचा मानला जातो.
१८ हजारांचा बेसिक पे ७२ हजारांवर?
फिटमेंट फॅक्टर ४.०० ठेवण्याची मागणी मान्य झाली आणि त्यानुसार शिफारस करण्यात आली, तर सध्याचा १८ हजार रुपयांचा किमान बेसिक पगार वाढून ७२ हजार रुपये होऊ शकतो.
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाकडून फिटमेंट फॅक्टर ४.०० ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांच्या मते, ही मागणी विविध आर्थिक आकडेवारी आणि कर्मचाऱ्यांच्या खर्चाचा विचार करून मांडण्यात आली आहे.
८८ हजारांची गणना कशी झाली?
या मागणीमागील गणनेत २०१६-१७ ते २०२४-२५ या कालावधीत नेट नॅशनल इनकममध्ये झालेल्या ८६.७६ टक्के वाढीचा आधार घेण्यात आला आहे. त्यानंतर पाच सदस्यांच्या कुटुंबाचा खर्च लक्षात घेऊन सुमारे ८८,५२४ रुपयांचा आकडा समोर आला.
मात्र, सरकारच्या तिजोरीवर पडणारा संभाव्य आर्थिक भार लक्षात घेता हा आकडा कमी करून ७२ हजार रुपयांचा बेसिक पे गृहीत धरल्याचे सांगण्यात आले आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि केंद्र सरकारचा निर्णय झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रत्यक्ष किती वाढ होणार, हे स्पष्ट होईल.