नवी दिल्ली : मान्सूनच्या परतीचा काळ सुरू झाला असतानाच देशातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. दक्षिण भारतातील ९ राज्यांना रविवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा परिणाम पुढील काही दिवसांत अनेक भागांत जाणवण्याची शक्यता आहे.
या हवामान प्रणालीचे २३ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ ‘डीप डिप्रेशन’मध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओडिशातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
‘डीप डिप्रेशन’ ही कमी दाबाच्या क्षेत्रापेक्षा अधिक तीव्र हवामान प्रणाली मानली जाते. या प्रणालीमुळे पुढे चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.
ओडिशातील बालासोर, भद्रक, जाजपूर, केंद्रपाडा, जगतसिंहपूर, कटक, ढेंकनाल, पुरी, खुर्दा आणि नयागड या दहा जिल्ह्यांमध्ये ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या भागांत मुसळधार पावसाची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशात पुरामुळे नदीच्या प्रवाह आणि धूपेमुळे सुमारे १२ एकर जमीन वाहून गेली आहे. छत्तीसगडमध्ये शनिवारी वीज कोसळण्याच्या विविध घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
हवामानातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांतील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.