वॉशिंग्टन : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तणाव पुन्हा वाढला आहे. इराणने कतारच्या मध्यस्थीमार्फत अमेरिकेसमोर चर्चेसाठी सात अटी ठेवल्याचे समोर आले आहे. या अटींबाबत अमेरिकेच्या भूमिकेकडे इराणचे लक्ष असून, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठ्या लष्करी कारवाईबाबत निर्णय घेण्याच्या स्थितीत असल्याचे वृत्त आहे.
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेजाई यांनी अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत कतारच्या माध्यमातून इराणच्या अटी अमेरिकेपर्यंत पोहोचवल्याचे सांगितले. यामध्ये सर्व आघाड्यांवरील युद्ध थांबवणे, गोठवलेला इराणचा निधी मुक्त करणे आणि अमेरिकेची नौदल नाकेबंदी हटवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सातही अटींचा संपूर्ण तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
‘निर्णायक युद्धासाठी तयार’
अमेरिकेने मागण्या मान्य न केल्यास इराण निर्णायक युद्धासाठी तयार असल्याचा इशारा रेजाई यांनी दिला. त्याचवेळी कतार आणि पाकिस्तानकडून अमेरिका-इराण यांच्यात पुन्हा चर्चेचा मार्ग खुला करण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, ट्रम्प यांनी इराणविरोधातील मोठी लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्याबाबत आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या टप्प्यावर असल्याचे म्हटले आहे. पुढील आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये आखाती देशांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचीही त्यांची योजना आहे.
अमेरिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने या भागातील आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कुवेत, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, ओमान, इराक, इराण, लेबनॉन आणि जॉर्डन या नऊ देशांमध्ये अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. संभाव्य संघर्षवाढ, विमानसेवा विस्कळीत होणे आणि हवाई क्षेत्र बंद होण्यासारख्या परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराण संघर्षाचा पुढील टप्पा कोणता असेल, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. सध्या एका बाजूला चर्चेचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे लष्करी संघर्ष वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.