Skip to content
Menu

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधूंचा आज मोर्चा; काँग्रेस, राष्ट्रवादीचाही पाठिंबा

October 4, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

मुंबई, दि. ४ : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज, रविवारी ‘विराट गर्जना मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाला काँग्रेस तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटानेही पाठिंबा दिला आहे.

या मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहभागी नागरिकांनी केवळ तिरंगा हातात घेऊन मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केले आहे.

ठाकरे बंधूंचा हा दुसरा संयुक्त मोर्चा आहे. यापूर्वीच्या मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी यावेळीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. मोर्चात कोणत्या घोषणा दिल्या जाणार, तसेच निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात उद्धव ठाकरे व राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मोर्चासाठी मनसे आणि ‘उबाठा’ गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता असल्याचे मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

मेट्रो सिनेमापासून महापालिका मुख्यालयापर्यंत

‘विराट गर्जना मोर्चा’ची सुरुवात सकाळी ११ वाजता मेट्रो सिनेमापासून होणार आहे. तेथून मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने रवाना होईल. महापालिका मुख्यालयाजवळ मोर्चाचे सभेत रूपांतर होणार असून, यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भाषणे होण्याची शक्यता आहे.

एसआयआर प्रक्रिया, निवडणूक आयोगाचा कारभार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत या सभेत ठाकरे बंधूंकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.