निवडणूक आयोग आणि भाजपची अभद्र युती; नाना पटोलेंचा हल्लाबोल
भंडारा, दि. ४ : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आज मुंबईत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या ‘गर्जना मोर्चा’ला काँग्रेसने पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस या आंदोलनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असेल, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एसआयआर आणि मत चोरीच्या मुद्द्यावर ज्या प्रकारे गोंधळ घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे, त्याची वस्तुस्थिती आता जनतेसमोर येत असल्याचे पटोले म्हणाले. ‘‘ज्ञानेश कुमार, नरेंद्र मोदी आणि भाजपची अभद्र युती लोकशाहीची रोज हत्या करीत आहे,’’ असा आरोपही त्यांनी केला.
देशाची लोकशाही वाचवणे ही केवळ काँग्रेसचीच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे हा केवळ राजकीय मुद्दा मानता येणार नाही. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी जे कोणी मैदानात उतरतील, त्यांच्यासोबत काँग्रेस प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उभी राहील, असे पटोले यांनी सांगितले.
ठाकरे बंधूंचा आज ‘गर्जना मोर्चा’
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात येणार आहे. ‘लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी गर्जना’ अशी या मोर्चाची भूमिका मांडण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांतील नेते, पदाधिकारी आणि नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही भाजपवर टीका
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही नाना पटोले यांनी भाजप सरकारवर टीका केली. दुष्काळ आणि किडीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पंकज भोयर जिल्हा दौऱ्यावर आले असताना तुमसर येथे शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून हक्काचा बोनस मिळालेला नाही, हमीभावाचा प्रश्न कायम आहे आणि दुसरीकडे महागाई वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात नाराजी वाढत असल्याचा दावा पटोले यांनी केला.
भाजपचे मंत्री आणि आमदारही आता बंदोबस्तात दौरे करत असल्याचे सांगत, ‘‘शेतकऱ्यांचा रोष इतका वाढला आहे की भाजपचे मंत्री रस्त्यावरही सुरक्षित नाहीत,’’ अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, पालकमंत्री पंकज भोयर यांनी जिल्ह्यातील ९ ते १० ठिकाणी शेतबांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या असून, बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.