मुंबई : प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर जाहिरात केल्याचा प्रकार तसेच औषधांची साठवणूक, अभिलेख आणि साठा व्यवस्थापनात गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यातील वडकी येथील सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या सी अँड एफ गोदामाचा औषध विक्री-वितरण परवाना रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून १ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात आदेश पारित करण्यात आला.
तपासणीत औषधसाठ्यात तफावत
वडकी येथील गोदामाच्या तपासणीदरम्यान ‘रिॲक्टिन प्लस’ या अनुसूची एच औषधाचा साठा आढळला. तपासणीमध्ये खरेदी पावत्यांवर आवश्यक अनुक्रमांक नसणे, विक्री पावत्यांच्या दुय्यम प्रतींवर सक्षम व्यक्तीची स्वाक्षरी नसणे तसेच संगणकीय प्रणालीतील नोंदी आणि प्रत्यक्ष औषधसाठ्यामध्ये तफावत आढळून आली.
या तफावतीमध्ये प्रतिजैविक औषधांचाही समावेश असल्याचे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले आहे. याशिवाय प्रिस्क्रिप्शन औषधाच्या पॅकेजिंगवर जाहिरात केल्याचा मुद्दाही कारवाईत समोर आला.
सुधारित कारणे दाखवा नोटीस
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कंपनीने लेखी उत्तर सादर केले तसेच वैयक्तिक सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार यापूर्वीची कार्यवाही मागे घेण्यात आली. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी कंपनीला सुधारित कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
विहित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने १ ऑक्टोबर रोजी वडकी येथील सी अँड एफ गोदामाचा औषध विक्री-वितरण परवाना रद्द करण्याचा आदेश दिला.
सिप्लाकडून कायदेशीर पर्यायांचा विचार
दरम्यान, पुण्यातील कंपनीचे सी अँड एफ केंद्र औषधांच्या साठवणूक आणि वितरणासंदर्भातील निर्धारित नियम व मानकांचे पालन करते, असा दावा सिप्लाने केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशाचा आढावा घेत असून, पुढील कायदेशीर पर्यायांचा विचार केला जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
रुग्ण आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांना सुरक्षित, उच्च दर्जाची आणि प्रभावी औषधे उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही सिप्लाने म्हटले आहे.