मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली असताना राज्याच्या गृह विभागाने आंदोलनांबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतील आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर लक्ष्मण हाके यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने तातडीने आदेश जारी केले आहेत.
आझाद मैदानातही वेळेची मर्यादा
नव्या नियमांनुसार आंदोलनासाठी आझाद मैदान हेच अधिकृत ठिकाण राहणार आहे. येथेही एका दिवसापेक्षा अधिक काळ आंदोलन करता येणार नाही. सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेतच आंदोलन करण्याची परवानगी असेल. त्यानंतर आंदोलकांनी मैदान रिकामे करणे बंधनकारक असेल.
शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी दिली जाणार नाही. मुंबई जिमखाना, महापालिका मुख्यालय, हजारीमल सोमाणी मार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्राच्या आसपासच्या भागासाठीही निर्बंध निश्चित करण्यात आले आहेत.
पाच हजार आंदोलकांनाच परवानगी
गृह विभागाच्या आदेशानुसार एका आंदोलनात जास्तीत जास्त पाच हजार लोक सहभागी होऊ शकतील. आंदोलकांनी आझाद मैदानातच प्रवेश करावा आणि आंदोलन संपल्यानंतर तेथूनच बाहेर पडावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मोर्चा काढणे आणि बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, रिक्षा, हातगाडी, जड वाहने किंवा प्राणी आणण्यास मनाई करण्यात आली आहे.
बॅनर, लाऊडस्पीकरवरही निर्बंध
पोलिसांची विशेष परवानगी घेतल्याशिवाय लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही. तसेच ९ बाय ६ फुटांपेक्षा मोठे बॅनर किंवा झेंडे लावण्यास परवानगी नसेल. झेंड्याच्या काठीची लांबी दोन फुटांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही.
आंदोलनाच्या ठिकाणी तंबू किंवा मंडप उभारण्यासही बंदी असेल. लाठ्या, तलवारी, भाले यांसारखी हत्यारे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
जरांगे आणि हाके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथून आंदोलनाची घोषणा करत मुंबईतही येण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, जरांगे आंदोलनावर ठाम आहेत.
दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा होण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह विभागाने हे निर्बंध लागू केल्याचे सांगितले जात आहे.