Skip to content
Menu

नाशिकमध्ये कांदा एक्स्प्रेस रोखली! सडका कांदा दिल्लीला पाठवण्याचा आरोप; प्रहारच्या कार्यकर्त्याचा गोंधळ

August 26, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकावरील मालधक्क्यावर कांदा एक्स्प्रेस रोखण्यात आल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दिल्लीकडे रवाना होण्यासाठी सज्ज असलेल्या या मालगाडीत खराब आणि सडका कांदा भरला जात असल्याचा आरोप प्रहारचे कार्यकर्ते गणेश निंबाळकर यांनी केला.

४५० टन कांदा दिल्लीला जाणार होता

लासलगाव येथून सुमारे ४५० टन कांदा रेल्वेने दिल्लीला पाठवण्याची तयारी सुरू होती. मात्र, मालगाडी रवाना होण्यापूर्वी गणेश निंबाळकर मालधक्क्यावर पोहोचले आणि त्यांनी कांदा एक्स्प्रेस रोखून धरली.

रॅकमध्ये खराब दर्जाचा आणि सडलेला कांदा भरला जात असल्याचा आरोप करत त्यांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला.

पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरपीएफचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निंबाळकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, खराब कांद्याबाबत समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत मालगाडी रवाना होऊ देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

त्यामुळे कांदा एक्स्प्रेस काही काळ लासलगाव रेल्वे स्थानकाच्या मालधक्क्यावरच उभी राहिली.

दिल्लीला कांदा पाठवण्यावर शेतकऱ्यांचा आक्षेप

दिल्ली, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये कांद्याच्या दरात वाढ झाल्याने ती नियंत्रित करण्यासाठी नाफेडने खरेदी केलेला कांदा लासलगावहून दिल्लीला पाठवला जात आहे. मात्र, या निर्णयावर काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कांदा दिल्लीला पाठवण्याऐवजी त्याची परदेशात निर्यात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे कांदा एक्स्प्रेसच्या मुद्द्यावरून लासलगावमध्ये शेतकरी आणि प्रशासनामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.