जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून, आता आंदोलनाच्या पुढील टप्प्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबईकडे जाण्याचा इशारा दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला उद्या (12 सप्टेंबर) अंतरवाली सराटीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
उद्या दुपारी 12 वाजता गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नांवर महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शक्य तितक्या मोठ्या संख्येने प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आता हा निर्णायक टप्पा असून, घरात बसून टीव्हीवर बैठक पाहण्याची वेळ राहिलेली नाही, असे त्यांनी म्हटले.
मराठा समाजाच्या पुढील आंदोलनाची दिशा या बैठकीत निश्चित होणार असून, मुंबईकडे जाण्याचा मार्ग आणि त्याचे नियोजनही यावेळी जाहीर केले जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. ज्यांना अंतरवालीत येणे शक्य नाही, त्यांनी आंदोलनाच्या मार्गावर येऊन पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.
‘मुंबईचा मार्ग ठरल्यानंतर गावागावातून मदत करा’
मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ज्या ठिकाणी आंदोलनाचा मुक्काम असेल, त्या परिसरातील मराठा बांधवांनी आंदोलकांसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती जरांगे पाटील यांनी केली. गावागावातील नागरिकांनी एकत्र येऊन वाहनांची व्यवस्था करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आरक्षणाचा प्रश्न आणि शेतीसमोरील अडचणी गंभीर आहेत. त्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याऐवजी गाव आणि घराची जबाबदारी सांभाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परवानगी मिळाली नाही तरी मुंबईकडे जाण्याचा निर्धार
मुंबईला जाण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाली किंवा नाही, तरी आंदोलन मुंबईकडे नेण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. मागील वेळी परवानगी नाकारण्यात आली होती; मात्र यावेळी आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईत आंदोलनादरम्यान अडचणी निर्माण झाल्यास राज्यभरातील मराठा बांधवांनी रस्त्यावर उतरून पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईकडे जाण्याची तारीख निश्चित होताच प्रत्येकाने आपली कामे बाजूला ठेवून आंदोलनाला साथ द्यावी, असे जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, सरकारने जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी वंशावळ आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुराव्यांचा मुद्दा अद्याप कायम आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण आणि आंदोलन सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.