Skip to content
Menu

कार्यक्रमाच्या सात दिवस आधी द्यावी लागणार माहिती; अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षिततेवर प्रशासनाचा भर

September 12, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

पिंपरी : गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या महाप्रसादाची तयारी आणि अन्नवाटप सुरक्षित पद्धतीने व्हावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केटरर्ससाठी काही नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार महाप्रसादाची ऑर्डर घेण्यापूर्वी संबंधित केटरर्सना FDAची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

महाप्रसादाच्या कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी केटरर्सनी FDAचा पूर्वनियोजन नमुना भरून संबंधित विभागातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. ही प्रक्रिया गणेश मंडळांनी नव्हे, तर महाप्रसाद तयार करून देणाऱ्या केटरर्सनी पूर्ण करणे अपेक्षित आहे.

महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. त्यामुळे तयार होणाऱ्या अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. मंडळांनीही केटरर्सची निवड करताना त्यांनी आवश्यक FDA प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हा नियम केवळ गणेशोत्सवापुरता मर्यादित राहणार नसून आगामी सण-उत्सवांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद आणि सामूहिक भोजनाच्या कार्यक्रमांनाही लागू राहणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या केटरर्सवर अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

केटरर्सना द्यावी लागणार ही माहिती

पूर्वनियोजन नमुन्यात कार्यक्रमाचे ठिकाण, तारीख, अपेक्षित लाभार्थींची संख्या, तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ आणि आयोजकांची माहिती द्यावी लागणार आहे. यासोबत केटरर्सचा FSSAI परवाना क्रमांक व त्याची वैधता, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्या वैद्यकीय तपासणीची माहितीही द्यावी लागेल.

पाण्याचा स्रोत, पाणी तपासणी अहवाल, FOSTAC प्रमाणित अन्नसुरक्षा पर्यवेक्षकाचे नाव व प्रमाणपत्र क्रमांक याचीही माहिती प्रशासनाला द्यावी लागणार आहे. तयार अन्नाचे नमुने ४८ तास जतन करण्याची व्यवस्था तसेच कच्चा माल कोणत्या पुरवठादाराकडून घेतला जातो, याची माहितीही नमुन्यात नमूद करावी लागणार आहे.