रत्नापूर : ब्रेक निकामी झाल्याने बार्शी आगाराची बार्शी-कळंब एसटी बस येरमाळा घाटात सुमारे १०० फूट खोल दरीत जाऊन पलटी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी रात्री घडली. रात्री १० ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ११ बीएल ९३५३ क्रमांकाची बस बार्शीहून कळंबच्या दिशेने जात होती. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी होते. येरमाळा घाट चढत असताना बस पुढे जाण्यात अडचण येत होती. त्यामुळे चालकाने काही प्रवाशांना खाली उतरविले, तर काही प्रवासी बसमध्येच थांबले.
त्यानंतर चालकाने बस पुन्हा घाट चढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस चढणीवर असतानाच अचानक चालकाचे नियंत्रण सुटले. बस वेगाने मागे सरकत रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे १०० फूट खोल दरीत जाऊन पलटी झाली.
अपघाताची माहिती मिळताच येरमाळा परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने येरमाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींसह अन्य प्रवाशांना पुढील उपचारासाठी धाराशिव येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
बसच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर
ब्रेक निकामी झाल्याने बसला अपघात झाल्याचे समोर आल्याने एसटी बसच्या देखभाल आणि तांत्रिक तपासणीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. घाटमार्गावर धावणाऱ्या बसची ब्रेकसह इंजिन, टायर आणि अन्य महत्त्वाच्या यंत्रणांची नियमित तपासणी केली जाते का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
या दुर्घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी २७ प्रवासी जखमी झाल्याने एसटी प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करावी, बसच्या तांत्रिक स्थितीची तपासणी करावी आणि निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.