मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारने चर्चेचे मार्ग बंद केल्यामुळेच जरांगेंसमोर मुंबईत येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असा आरोप राऊत यांनी केला.
मुंबईत आंदोलन झाल्यास गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना होणाऱ्या संभाव्य त्रासाला सरकारच जबाबदार असेल, असेही राऊत म्हणाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास सरकारकडूनच भाग पाडले जात असल्याचा आरोप केला.
‘गणेशोत्सवाला त्रास व्हावा, अशी जरांगेंची इच्छा नाही’
राऊत म्हणाले की, मनोज जरांगे हे समंजस नेते असून मुंबईकरांना किंवा गणेशोत्सवाला त्रास व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही. ज्या मध्य मुंबई आणि गिरगाव परिसरात आंदोलन होण्याची शक्यता आहे, त्याच भागात लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यांसह अनेक प्रसिद्ध सार्वजनिक गणपती आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक मुंबईत येतात. त्यामुळे उत्सवाच्या काळात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, अशी जरांगेंचीही भूमिका असल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र, सरकारने चर्चेचे मार्ग बंद केल्यामुळे परिस्थिती चिघळत असल्याचा दावा त्यांनी केला.
‘चर्चेचे दरवाजे बंद करणे ही चांगल्या सरकारची पद्धत नाही’
विरोधक किंवा आंदोलकांशी चर्चा न करणे योग्य नाही, असे सांगत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. गेल्या काही वर्षांत चर्चेचे दरवाजे बंद ठेवण्याची पद्धत निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
जरांगे अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सत्ताधारी अहंकाराने वागत असल्याची टीका राऊत यांनी केली.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी ‘शिव्या देऊन प्रश्न सुटत नाहीत’ असे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे योग्य असले तरी जरांगेंशी अधिकृतपणे चर्चा करण्याचा अधिकार महाजनांना मुख्यमंत्र्यांनी दिला आहे का, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.
‘महाराष्ट्राला जातीपातींत विभागण्याला शाह-फडणवीस जबाबदार’
महाराष्ट्रातील सध्याच्या जातीय तणावावरूनही राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. महाराष्ट्राला जाती-पोटजातींच्या वादात विभागण्यास हे दोघे जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विविध जाती-जमातींना एकत्र आणून एकजूट निर्माण केली होती. मात्र, आज राज्यात जातीय संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली असून त्याला भाजपचे नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप राऊत यांनी केला.