नवी दिल्ली : देशाच्या विविध भागांत पावसाने पुन्हा जोर धरला असून अनेक राज्यांना पुराचा फटका बसला आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे पिथौरागढ येथील कुलागड ओढ्यावरील सुमारे १७० फूट लांबीचा बेली ब्रिज पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला. त्यामुळे चीन सीमेजवळील व्यास, दारमा आणि चौदांस खोऱ्यांचा संपर्क तुटला आहे. विशेष म्हणजे हा पूल २७ ऑगस्ट रोजीच उभारण्यात आला होता. यापूर्वीचा पूल १८ ऑगस्टला दरड कोसळल्याने कोसळला होता.
दरम्यान, छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात हसदेव नदीत तीन महाविद्यालयीन विद्यार्थी वाहून गेल्याची घटना घडली. बिलासपूरच्या चौकसे कॉलेजमधील ११ विद्यार्थी शुक्रवारी सहलीसाठी देओरी गावात गेले होते. नदीकाठी सेल्फी घेत असताना एका विद्यार्थ्याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले अन्य दोन विद्यार्थीही नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. तिन्ही विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
बिहारमध्ये ४७ लाख नागरिक बाधित
बिहारमध्ये पुराची परिस्थिती गंभीर बनली असून राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ४७ लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. गंगेसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.
उत्तर प्रदेशातील २६ जिल्ह्यांमध्येही पूरस्थिती निर्माण झाली असून सुमारे चार लाख नागरिक बाधित झाले आहेत. आतापर्यंत २१ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. कानपूर आणि उन्नाव परिसरात गंगेची पाणीपातळी धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये काही ठिकाणी पुराचे पाणी दहा फुटांपर्यंत वाढले आहे.
मध्य प्रदेश, राजस्थानमध्येही पावसाचा जोर
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. मध्य प्रदेशातील १५ जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमधील २९ जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारी राजस्थानातील अलवर, सवाई माधोपूर आणि दौसा जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पावसामुळे दृश्यमानता १०० मीटरपेक्षा कमी झाली होती. तर दमोह जिल्ह्यातील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.