नवी दिल्ली : जगभरातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक तणावपूर्ण होत असून, त्याचा परिणाम आता सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही जाणवत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना त्यांनी बदलत्या जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
महामारी, हवामानाशी संबंधित आपत्ती आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांनी जग एकमेकांशी किती जोडलेले आहे, हे स्पष्ट केले आहे. एखाद्या भागात निर्माण झालेले संकट आता केवळ तिथेच मर्यादित राहत नाही, तर त्याचे परिणाम इतर देशांनाही भोगावे लागतात, असे मोदी यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर संकटांची वेळीच माहिती मिळणे, त्यासाठी आधीपासून तयारी करणे आणि गरज पडताच तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संसर्गजन्य आजारांसाठी नवी यंत्रणा
संसर्गजन्य आजारांचा वेळीच शोध घेऊन त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘ब्रिक्स इंटिग्रेटेड अर्ली वॉर्निंग सिस्टिम’वर सहमती झाल्याची माहिती मोदी यांनी दिली. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ‘अर्ली वॉर्निंग डेटा इंटिग्रेशन गाइडलाइन्स’ तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
चार स्तंभांवर भारताचा भर
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि स्थिरता या चार प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.
या माध्यमातून ब्रिक्स देशांमधील सहकार्य केवळ चर्चेपुरते मर्यादित न राहता, त्याचा प्रत्यक्ष फायदा सदस्य देशांना आणि त्यांच्या नागरिकांना मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्लोबल साउथचा विश्वास वाढला
ग्लोबल साउथ देशांचा ब्रिक्सवरील विश्वास वाढत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या देशांचे म्हणणे ऐकून घेतले जाते, त्यांच्या अनुभवांचा आदर केला जातो आणि उपाययोजना ठरवताना त्यांचा सहभागही घेतला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिक्सची खरी ताकद ही सदस्य देशांच्या विविधतेत आणि परस्पर सहकार्यामध्ये आहे. देशांची परिस्थिती आणि पार्श्वभूमी वेगळी असली तरी एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून विकास साधता येतो आणि त्याचा लाभ संपूर्ण मानवजातीला मिळू शकतो, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.