Skip to content
Menu

अशोक खरात प्रकरणाचा तपास परराज्यांपर्यंत; पंचतारांकित हॉटेलमधील भेटींचीही चौकशी

September 14, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

नाशिक : महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला आता व्यापक स्वरूप आले आहे. खरातचे कथित संपर्क केवळ नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, परराज्यातील काही महिलांशीही त्याचे संपर्क असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

तपासादरम्यान नाशिक-शिर्डी महामार्गावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काही महिलांशी खरातच्या भेटी झाल्याची माहितीही समोर आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या भेटींचे नेमके कारण आणि त्यामागील स्वरूप याबाबत तपास पथकाकडून चौकशी केली जात असल्याचे समजते.

महाराष्ट्रातील विविध भागांतील महिलांकडून खरातविरोधात तक्रारी करण्यात आल्याने यापूर्वीच या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता परराज्यातील महिलांशी असलेल्या कथित संपर्काची माहिती समोर आल्याने तपासाची दिशा आणखी विस्तारित झाली आहे.

धार्मिक कारण सांगून शिर्डीला येत असल्याची माहिती

सूत्रांच्या माहितीनुसार, काही महिला खरातला भेटण्यासाठी शिर्डी येथे पूजा, धार्मिक विधी किंवा दर्शनासाठी जात असल्याचे कुटुंबीयांना सांगत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटींविषयी कुटुंबीयांना संशय येत नसल्याचेही सांगितले जाते.

दरम्यान, खरातच्या संपर्कात असलेल्या काही महिलांची पोलिसांनी चौकशी केली असून, त्यापैकी काहींनी तक्रारी दाखल केल्याची माहिती आहे. मात्र, काही महिलांनी तक्रार करण्यास नकार दिल्याचेही समोर आले आहे. सामाजिक बदनामी तसेच वैवाहिक आयुष्यावर परिणाम होण्याची भीती हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

भेटींचे नेमके कारण काय?

खरात काही महिलांच्या संपर्कात धार्मिक विधी, पूजा किंवा अन्य कारणांचा आधार घेत असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. त्यानंतर ठरावीक ठिकाणी भेटींची व्यवस्था केली जात असल्याची माहिती तपासातून पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिक-शिर्डी महामार्गावरील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कथित भेटींच्या पार्श्वभूमीवर संबंधित महिलांशी नेमका कशासाठी संपर्क साधला जात होता, भेटींचा उद्देश काय होता आणि त्यामध्ये कोणते प्रकार घडले, याचा तपास सुरू आहे.

परराज्यातील महिलांनी अद्याप स्वतंत्र तक्रारी का दाखल केलेल्या नाहीत, त्यांची खरातशी ओळख कशी झाली आणि या संपर्कांचे नेमके स्वरूप काय होते, याबाबतही तपास यंत्रणा माहिती गोळा करत आहे. त्यामुळे खरातचे कथित संपर्कक्षेत्र नाशिक-अहिल्यानगरच्या पुढे कितपत विस्तारले होते, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.