Skip to content
Menu

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत; फडणवीसांची मोठी घोषणा

August 27, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

मुंबई : महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा जाहीर केला आहे. जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी या चालकांना आता एक वर्षाची मुदत देण्यात येणार असून, या कालावधीत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मराठी भाषा शिकण्यासाठी अधिक वेळ मिळावा, अशी मागणी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत सरकारने हा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘एक वर्षात जुजबी मराठी शिकावी लागेल’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. इतक्या कमी कालावधीत भाषा शिकणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे सरकारने मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. या कालावधीत विविध ठिकाणी वर्ग आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून चालक जुजबी मराठी शिकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संजय निरुपम यांनी व्यक्त केला आनंद

सरकारच्या निर्णयाचे स्वागत करताना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी हा निर्णय चांगला असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मराठी ही प्रेमाची भाषा असून ती प्रेमाने शिकली पाहिजे, सक्तीने नव्हे, अशी भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, १२ ऑगस्टच्या जीआरमध्ये करण्यात आलेल्या तरतुदींमध्ये सुधारणा करण्याची मागणी निरुपम यांनी केली. या जीआरनुसार अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत मराठी न शिकल्यास बॅज आणि परवाना जप्त करण्याची तरतूद असून, त्यानंतर आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे नव्या निर्णयानुसार या जीआरमध्ये सुधारणा किंवा तो रद्द करण्याची मागणी निरुपम यांनी केली.

चालक संघटनांकडून सरकारचे आभार

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांनी स्वागत केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून चालकांवर मराठी शिकण्याबाबत दबाव असल्याचे प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

‘मराठी बोला आणि महाराष्ट्र जोडा’ हा उपक्रम सुरू करण्याची माहितीही चालक संघटनांनी मुख्यमंत्र्यांना दिली. मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून, आगामी काळात यासाठी प्रशिक्षण वर्गही सुरू केले जाण्याची शक्यता आहे.