Skip to content
Menu

अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; दिल्लीकडून पाकिस्तानी अधिकाऱ्यांना समन्स

September 16, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

नवी दिल्ली : अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात भारतीय आणि पाकिस्तानी नौदलाच्या जहाजांमध्ये धडक झाल्याने दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक हालचाली वाढल्या आहेत. या घटनेनंतर भारताने बुधवारी पाकिस्तानच्या चार्ज डी’अफेअर्सना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून तीव्र निषेध नोंदवला.

परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचे वर्णन पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाचे ‘अस्वीकार्य आणि अव्यावसायिक’ वर्तन असे केले आहे. ही घटना आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात घडली असून, धडकेमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबरच्या संध्याकाळी उत्तर अरबी समुद्रात भारतीय नौदलाचे एक युद्धनौका नियमित देखरेख मोहिमेवर असताना पाकिस्तानी नौदलाचे जहाज त्याच्या जवळ आले. भारतीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी जहाज वेगाने पुढे येत असताना त्याची हालचाल सुरक्षित नसल्याने दोन्ही जहाजांची धडक झाली. या घटनेत मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही.

भारताचा पाकिस्तानला तीव्र आक्षेप

घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या चार्ज डी’अफेअर्सना पाचारण केले. समुद्रात लष्करी तुकड्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि दोन्ही देशांदरम्यान लागू असलेल्या करारांचे पालन करावे, असा संदेश पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

भारताने या घटनेबाबत इस्लामाबादमध्येही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे निषेध नोंदवण्याचे निर्देश आपल्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

१९९१च्या कराराचा मुद्दा

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा संबंध एप्रिल १९९१ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या लष्करी कवायती, हालचाली आणि त्याबाबतच्या आगाऊ सूचनांशी संबंधित कराराच्या कलम १०शी जोडला आहे.

भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी नौदलाच्या जहाजाची ही हालचाल या करारातील तरतुदींशी विसंगत होती. या कराराचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करी हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या गैरसमजांना आणि संभाव्य दुर्घटनांना आळा घालणे हा आहे.

भविष्यात अशी घटना टाळण्याचे आवाहन

या घटनेनंतर भारताने समुद्रातील सर्व लष्करी तुकड्यांनी अधिक काळजीपूर्वक हालचाली कराव्यात, तसेच संबंधित द्विपक्षीय करारांतील नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, घटनेतील दोन्ही नौदल जहाजांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाहीत. पाकिस्तानकडून या घटनेबाबत तत्काळ अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याचे वृत्त आहे.