मुंबई : महाराष्ट्रातील विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR रद्द करण्याची मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पात्र नागरिकांचा मतदानाचा अधिकार कायम राहावा आणि मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह व्हावी, या उद्देशाने SIR प्रक्रिया महत्त्वाची असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत काढलेल्या ‘गर्जना मोर्चा’मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर टीका केली होती. महाराष्ट्रातील SIR रद्द करण्याबरोबरच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही राज ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे SIR संदर्भातील आकडेवारी आणि पुढील प्रक्रियेची माहिती दिली.
९.७१ कोटी मतदार प्रारूप यादीत
फडणवीस यांच्या माहितीनुसार, SIR सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील ९.७८ कोटींपेक्षा अधिक मतदार आधारभूत यादीत होते. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ७.७१ कोटींपेक्षा अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
जुन्या मतदार यादीतील काही मतदारांची गणना प्रपत्रे प्राप्त न झाल्याने त्यांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. यामध्ये गैरहजर, स्थलांतरित, मृत किंवा अन्यत्र दुबार नोंदणी झालेल्या मतदारांचा समावेश आहे.
ASDD यादीही उपलब्ध
प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना EPIC क्रमांकाच्या माध्यमातून आपले नाव तपासता येणार असून, मतदान केंद्रनिहाय ASDD यादीही पाहता आणि डाउनलोड करता येणार आहे.
नाव वगळले असल्यास पुन्हा संधी
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना प्रपत्र-६ आणि घोषणापत्राच्या माध्यमातून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनाही प्रपत्र-६ भरून मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal वर करता येईल. तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे.
संकेतस्थळावर यादी उपलब्ध
प्रारूप मतदार यादी तसेच SIR अंतर्गत तयार करण्यात आलेली ASDD यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांना EPIC क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाच्या आधारे आपले नाव तपासता येणार आहे.
योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट केली जातील. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून, गरज असल्यास विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज ठाकरेंचा SIRला विरोध
दरम्यान, ४ ऑक्टोबरच्या ‘गर्जना मोर्चा’मध्ये राज ठाकरे यांनी SIR प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला होता. २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असले तरी राज्यात विजयाचे वातावरण दिसले नाही, असा दावा त्यांनी केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या वाढल्याचा उल्लेख करत त्यांनी मतांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केला.
मतचोरीचा मुद्दा आपण २०१७ पासून मांडत असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी यापूर्वी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतल्याचा उल्लेख केला. निवडणूक प्रक्रियेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत असल्याचे त्यांनी मोर्चादरम्यान सांगितले.