मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आरक्षण, जातीय भेदभाव, शिक्षणातील प्रश्न आणि शहरांच्या नामांतरावर आपली भूमिका मांडली. औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत असताना त्यांनी वेगळी भूमिका मांडत औरंगाबादचे नाव ‘औरंगाबाद’च ठेवावे आणि पुण्याचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे, असे म्हटले आहे.
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी सुजात आंबेडकर यांनी IIT बॉम्बे परिसरात आंदोलन केले होते. यानंतर आयोजित कार्यक्रमात वाकोडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांनी देशातील तरुणांचे प्रश्न, आरक्षण आणि जातीय भेदभावासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका
काही दिवसांपूर्वी देशातील Gen-Z तरुणांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. तरुणांनी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे ही महत्त्वाची बाब असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले. मात्र आरक्षण हटवण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात जातीय द्वेष आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला.
आरक्षणाची गरज सामाजिक विषमता आणि प्रतिनिधित्वाच्या प्रश्नातून निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणामुळे जातिव्यवस्था निर्माण झालेली नाही, तर समाजातील विषमतेमुळे आरक्षणाची आवश्यकता निर्माण झाली, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आरक्षण केवळ आर्थिक निकषावर आधारित नसून सामाजिक मागासलेपणा आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधित्वाशी त्याचा संबंध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एखादी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तरी तिची सामाजिक ओळख आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न संपत नाहीत, असा दावा त्यांनी केला.
आरक्षण संपवण्याची मागणी करणाऱ्यांनी देशातील संपत्तीचे वितरण, उच्च शिक्षण आणि विविध क्षेत्रांतील सामाजिक प्रतिनिधित्वाचा आढावा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय विद्यापीठांमधील प्राध्यापकांपासून विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांपर्यंत कोणत्या समाजाचे किती प्रतिनिधित्व आहे, यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
साहिल वाकोडे प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
साहिल वाकोडे यांच्या मृत्यूचा उल्लेख करताना सुजात आंबेडकर यांनी या प्रकरणातील जातीय भेदभावाच्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवरील जातीय दबाव किंवा भेदभावाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे त्यांनी म्हटले.
वाकोडे यांच्या कुटुंबीयांनीही IIT बॉम्बे प्रशासनाशी संबंधित व्यक्तींवर कारवाई आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांच्या पालकांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले होते.
‘औरंगाबाद’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’वर वेगळी भूमिका
कार्यक्रमात शहराच्या नामांतराबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सुजात आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एखाद्या राजाच्या नावाने शहराचे नामकरण करायचे असेल, तर त्या राजाची राजधानी किंवा त्याच्या राज्यकारभाराशी संबंधित शहराला ते नाव देण्याचा तर्क त्यांनी मांडला.
याच पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहावे आणि पुण्याचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे, असे त्यांनी म्हटले. या मुद्द्यावरून त्यांनी पुण्यातील जातीय राजकारणावरही प्रश्न उपस्थित केले.
विद्यार्थ्यांनी मांडल्या शिक्षणातील अडचणी
कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थिनींनीही आपल्या विविध समस्या मांडल्या. M.Phil आणि PhD प्रवेश, बोनाफाइड प्रमाणपत्रासाठी आकारले जाणारे शुल्क, कुलगुरूंची भेट न मिळणे, मिलिंद कॉलेजमधील सुविधा आणि अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश अशा प्रश्नांचा त्यात समावेश होता.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव असलेल्या विद्यापीठातच आम्हाला शिक्षणापासून वंचित का ठेवले जात आहे?’ असा सवाल एका विद्यार्थिनीने केला.
मिलिंद कॉलेजमधील सुविधांबाबतच्या प्रश्नावर सुजात आंबेडकर यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. कॉलेजच्या कारभाराचे ऑडिट करून ते सार्वजनिक करावे, अशी मागणी त्यांनी केली. कागदपत्रांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडकवून त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण केले जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.