Skip to content
Menu

अभिजीत दिपकेंच्या वक्तव्यावरून वाद; सचिन खरातांकडून जाहीर माफीची मागणी

October 3, 2026
महाराष्ट्र

मुंबई : शिवाजी पार्क येथे कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट)चे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आक्षेप घेतला आहे.

अभिजीत दिपके यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. माफी न मागितल्यास आंबेडकरी जनता त्यांच्या तोंडाला काळे फासेल, असा इशाराही त्यांनी दिला.

खरात यांनी दिपके यांच्या वक्तव्याचा निषेध करताना म्हटले की, नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला, असे म्हणणे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्यघटना दिली आणि नागरिकांच्या अधिकारांसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे दिपके यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करू नये, असेही खरात यांनी म्हटले.

दरम्यान, दिपके यांनी आंदोलनावेळी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाचा उल्लेख केला होता. गांधी हे देशाचा आत्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचा कणा तर पंडित नेहरू देशाचे मन असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, देशातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यात नेहरू आणि आंबेडकर यांची भूमिका असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सचिन खरात यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय भूमिकेचा आणि तत्कालीन काँग्रेससोबतच्या संबंधांचा संदर्भ दिला. भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत नेहरू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात प्रचार केला होता, असा दावा त्यांनी केला. तसेच, दलित समाजाच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्यासाठी डॉ. आंबेडकर सायमन कमिशनला भेटले असताना काँग्रेसकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आल्याचेही खरात यांनी सांगितले.

या वक्तव्यांमुळे अभिजीत दिपके आणि सचिन खरात यांच्यातील वाद आता अधिक तीव्र झाला आहे.