Skip to content
Menu

बडगाम चकमकीत लश्करचा कमांडर हाशिम मुसा ठार; परिसरात शोधमोहीम सुरू

September 30, 2026
देश-विदेश

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. खानसाहिब परिसरातील पलमदान मुगपत्री वनक्षेत्रात झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तैबाचा कमांडर हाशिम मुसा उर्फ फौजी मुसा ठार झाला. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू आहे.

मंगळवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांना बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली.

संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर चकमक

युसमार्गच्या कोराग परिसरात शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दलांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. जवानांनी परिसराची पाहणी सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमक सुरू झाली.

या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्याची ओळख लश्कर-ए-तैबाचा कमांडर हाशिम मुसा अशी झाल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी सांगितले.

‘ऑपरेशन कोराग’ अंतर्गत कारवाई

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या कारवाईची माहिती सोशल मीडियावर दिली. ‘ऑपरेशन कोराग’ अंतर्गत ही संयुक्त कारवाई करण्यात आल्याचे लष्कराने म्हटले आहे.

दरम्यान, परिसरात आणखी दहशतवादी लपलेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा दलांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. दहशतवाद्यांना परिसरातून पळून जाण्याची संधी मिळू नये, यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. शोधमोहीम अद्याप सुरू आहे.