नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP कडून शुक्रवारी देशभर आंदोलन करण्यात आले. मुंबईतील शिवाजी पार्कसह दिल्लीतील जंतर-मंतर येथेही आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले.
सुरक्षेच्या कारणास्तव मध्य दिल्लीतील महत्त्वाच्या भागांमध्ये अतिरिक्त पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. जंतर-मंतर परिसरात काही ठिकाणी जामर लावण्यात आल्याची माहिती आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेतही काही बदल करण्यात आले आहेत.
SIR प्रक्रियेवरून वाद
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या अहवालानंतर SIR प्रक्रियेबाबत नव्या चर्चेला सुरुवात झाली. या अहवालानुसार, निवडणूक आयुक्त विवेक जोशी आणि सुखबीर सिंह संधू यांनी गेल्या १० महिन्यांत SIR प्रक्रियेबाबत किमान १४ वेळा आक्षेप नोंदवल्याचे समोर आले आहे.
यानंतर विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत CJP कडून मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
मुंबईतही आंदोलन
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथेही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही काही कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
११ मेट्रो स्थानकांवर प्रवेश बंद
जंतर-मंतर परिसरातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोच्या ११ स्थानकांवर प्रवाशांना प्रवेश बंद ठेवण्यात आला. यामध्ये जनपथ, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट, राजीव चौक, सेवा तीर्थ, मंडी हाऊस, लोक कल्याण मार्ग, INA, चावडी बाजार आणि रामकृष्ण आश्रम मार्ग या स्थानकांचा समावेश आहे.
मात्र राजीव चौक, मंडी हाऊस, नवी दिल्ली आणि सेंट्रल सेक्रेटरिएट या स्थानकांवर इंटरचेंजची सुविधा सुरू ठेवण्यात आली आहे.
जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव मध्य दिल्लीतील काही भागांत वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले असून काही मार्गांमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आज दिल्ली मेट्रो आणि रस्ते प्रवासाचे नियोजन करताना या निर्बंधांची माहिती घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.