मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्याच्या हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काहीसा कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कायम राहणार असून, रविवारी उत्तर महाराष्ट्रातील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात १२ ते १६ सप्टेंबरदरम्यान अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रात १२ आणि १३ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात १२ सप्टेंबरला काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात १२ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार, तर १३ आणि १४ सप्टेंबर रोजी मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील अनेक भागांत पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळे रस्ते आणि सखल भागात पाणी साचू शकते. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.