Skip to content
Menu

सोनं खरेदीदारांना दिलासा; सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

September 8, 2026
देश-विदेश

Gold Price Today : सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आज काहीशी दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 660 रुपयांनी, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 610 रुपयांनी कमी झाला आहे.

कमकुवत जागतिक संकेतांचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात प्रत्येकी 10 रुपयांची घट झाली आहे.

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1 लाख 54 हजार रुपये आहे. मात्र, शहरानुसार सोन्याच्या दरात थोडाफार फरक असू शकतो. त्यामुळे दागिने किंवा सोने खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासणे महत्त्वाचे आहे.

प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

मनीकंट्रोलच्या माहितीनुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये आज प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत :

  • दिल्ली : 24 कॅरेट – ₹1,54,290 | 22 कॅरेट – ₹1,41,440 | 18 कॅरेट – ₹1,15,750
  • मुंबई : 24 कॅरेट – ₹1,54,140 | 22 कॅरेट – ₹1,41,290 | 18 कॅरेट – ₹1,15,600
  • पुणे : 24 कॅरेट – ₹1,54,140 | 22 कॅरेट – ₹1,41,290 | 18 कॅरेट – ₹1,15,600

सोन्याचे दर बाजारातील चढ-उतार, शहर, कर आणि इतर शुल्कांनुसार बदलू शकतात. तसेच, दागिने खरेदी करताना मेकिंग चार्ज आणि GST वेगळा आकारला जातो.

चांदीही झाली स्वस्त

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही आज किरकोळ घसरण झाली आहे. सलग चार दिवस चांदीचा दर स्थिर राहिल्यानंतर आज प्रति किलो 100 रुपयांची घट झाली.

दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे चांदीचा दर ₹2,49,900 प्रति किलो, तर चेन्नईमध्ये ₹2,54,900 प्रति किलो झाला आहे.

सप्टेंबरच्या सुरुवातीला चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळाली होती. 1 आणि 2 सप्टेंबरला चांदीच्या दरात प्रत्येकी 5 हजार रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर 3 सप्टेंबरला चांदी पुन्हा 5 हजार रुपयांनी महागली. आता पुन्हा चांदीच्या दरात किरकोळ घट झाली आहे.

सोन्याचे दर का घसरले?

आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेत हे सोन्याच्या दरातील घसरणीमागील प्रमुख कारण मानले जात आहे. अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली राहिल्याने फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदर धोरणाबाबत बाजारात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

ब्रोकरेज प्लॅटफॉर्म Lemonnचे रिसर्च हेड गौरव गर्ग यांच्या मते, सध्या सोन्याच्या दरावर दबाव कायम आहे. अमेरिकेतील रोजगाराची स्थिती अपेक्षेपेक्षा मजबूत राहिल्याने सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत काय निर्णय घेणार, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या दरावरही दिसून येत आहे.