Skip to content
Menu

मान्सून पुन्हा सक्रिय; २४ राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

September 5, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर आता देशात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील २४ तासांसाठी देशातील अनेक राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता असून, ताशी ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ऑगस्टमध्ये महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे काही भागांत पिकांचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचा परिणाम देशाच्या पूर्व आणि मध्य भागातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्येही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या राज्यांना पावसाचा इशारा

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, गुजरात, महाराष्ट्र, त्रिपुरा, आसाम, नागालँड, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पुढील २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे.

काही ठिकाणी मुसळधार पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. समुद्रही खवळण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार?

महाराष्ट्रासाठीही हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, काही भागांत जोरदार सरी कोसळू शकतात. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे.

राज्यातील उर्वरित भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी जोरदार वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे.