Skip to content
Menu

नेपाळमध्ये पुन्हा महापुराचा धोका; भूस्खलनाने नदीचा प्रवाह रोखला चौलानी नदीत कृत्रिम तलाव तयार; भारताच्या सीमावर्ती गावांना हायअलर्ट

September 5, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

काठमांडू : नुकत्याच आलेल्या भीषण पुरातून नेपाळ सावरत असतानाच पश्चिम भागात पुन्हा संकट निर्माण झाले आहे. दार्चुला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने चौलानी (चमेलिया) नदीचा प्रवाह अंशतः थांबला आहे. डोंगराचा मोठा भाग नदीपात्रात कोसळल्याने पाण्याचा साठा तयार झाला असून, हा नैसर्गिक अडथळा फुटल्यास खालच्या भागात अचानक मोठा पूर येण्याची शक्यता आहे.

दार्चुला जिल्ह्यातील अपी हिमाल ग्रामीण नगरपालिकेच्या भट्टार परिसरात ही घटना घडली. भूस्खलनानंतर नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला असून, त्यामागे पाणी साचत आहे. डोंगराचा आणखी काही भाग नदीत कोसळल्यास नदीचा प्रवाह पूर्णपणे बंद होऊन पाण्याचा दबाव वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. अचानक हा अडथळा फुटल्यास नदीकाठच्या वस्त्यांना मोठा फटका बसू शकतो.

भारताच्या सीमेलगतही सतर्कता

चौलानी नदी पुढे जाऊन भारत-नेपाळची नैसर्गिक सीमा असलेल्या महाकाली नदीला मिळते. त्यामुळे नेपाळमधील संभाव्य पुराचा परिणाम भारताच्या सीमावर्ती भागावरही होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नेपाळ प्रशासनासह भारतीय सीमेलगतच्या गावांनाही सतर्क करण्यात आले आहे.

सुरक्षा दल तैनात; नदीच्या पातळीवर नजर

परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री खगराज भट्टा यांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. चमेलिया जलविद्युत सुरक्षा तळावरून सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नदीतील पाण्याच्या पातळीवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.

सखल भागातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि गरज भासल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, यासाठी लाऊडस्पीकरद्वारे सूचना दिल्या जात आहेत.

आधीच पुराचा मोठा तडाखा

नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या महापूर आणि भूस्खलनाच्या आपत्तीत आतापर्यंत १,३४२ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४,८८६ पेक्षा जास्त नागरिक बेपत्ता आहेत. चितवन, नवलपरासी, नुवाकोट आणि रसुवा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर दार्चुलातील नव्या भूस्खलनामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.