काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील गीरोंग परिसरात २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण दरड कोसळल्यानंतर आलेल्या महापुराने मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेबाबत चीनने प्रथमच अधिकृत आकडेवारी जाहीर केली असून, सीमाभागातील इमिग्रेशन आणि कस्टम इमारतीतून आतापर्यंत ३१ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ५३१ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती चिनी अधिकाऱ्यांनी दिली.
२६ ऑगस्टला गीरोंग भागात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. त्यानंतर नदीला अचानक आलेल्या महापुराचे पाणी सीमावर्ती इमिग्रेशन आणि कस्टम इमारतीत घुसले. या परिसरात उपस्थित असलेले अनेक नागरिक पुराच्या प्रवाहात वाहून गेले किंवा ढिगाऱ्याखाली अडकले. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, घटनास्थळावरून आतापर्यंत ९८७ वैयक्तिक वस्तू सापडल्या आहेत. या वस्तूंच्या आधारे बेपत्ता व्यक्तींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
महामार्ग उद्ध्वस्त; बचावकार्यात अडथळे
महापुरामुळे गीरोंग बंदराला जोडणारा जी-२१६ महामार्ग मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे बचाव पथके आणि जड यंत्रसामग्री घटनास्थळी पोहोचविण्यात अडचणी येत आहेत.
चिनी अधिकाऱ्यांच्या पाहणीत महामार्गावरील ५८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असल्याचे आढळले आहे. पुरामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून, परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला आहे.
विस्थापित नागरिकांसाठी प्रशासनाने दोन ठिकाणी तात्पुरती आपत्कालीन निवारा केंद्रे उभारली असून, मदतकार्य सुरू आहे.