नाशिक : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध आहे, असे कोण म्हणतं? असा सवाल करत चव्हाण यांनी २०२३ मध्ये महिला आरक्षणासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणल्याची आठवण करून दिली.
“महिला आरक्षणाचे जनक आम्हीच आहोत,” असा दावा करत चव्हाण यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. “RSS एखाद्या महिलेला संघचालक करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.
पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका
परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांवरूनही पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला धारेवर धरलं. वारंवार पेपर फुटत असून त्यामागे सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची जबाबदारी असल्याचा आरोप त्यांनी केला.
पेपर लाखो रुपयांना विकले जातात, तरीही संबंधितांवर कठोर कारवाई होत नसल्याचा दावा त्यांनी केला. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
रस्त्यांवरील खड्डे, कुंभमेळा अन् शक्तिपीठ मार्गावरून सवाल
राज्यातील रस्त्यांच्या अवस्थेवरूनही चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी म्हटलं.
नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या कामांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कुंभमेळ्याच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल उपलब्ध आहे का, असा सवाल करत कामांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शक्तिपीठ महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी होत असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला. या प्रकल्पासंदर्भात स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतलं जात नसून ठराविक लोकांनाच कंत्राटं दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
राहुल गांधींच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
दरम्यान, नाशिकमध्ये काँग्रेसचं गेल्या काही दिवसांपासून शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या समारोपासाठी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली.
या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. शक्तिपीठ महामार्ग, कुंभमेळ्याची कामं आणि शेतकऱ्यांच्या समस्या या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.
कुंभमेळ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत असून, या मुद्द्यावर केंद्र सरकारकडेही आवाज उठवण्याची भूमिका काँग्रेसकडून घेतली जाणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
राहुल गांधी शिबिरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, यासाठी राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.