मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (२ सप्टेंबर) महत्त्वाचा आदेश दिला. या प्रकरणाचा पुढील तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयानंतर दिशा यांच्या वडिलांनी न्यायालयाचे आभार मानले.
दिशा सालियान यांच्या मृत्यूच्या तपासात गंभीर त्रुटी राहिल्याचा आरोप त्यांचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. तसेच या प्रकरणाची नव्याने चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर बुधवारी न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिला.
न्यायालयाने तपासाबाबत महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत. कोणालाही सुरुवातीपासून आरोपी मानू नये, संबंधितांचे जबाब नोंदवावेत आणि तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढावा, असे निर्देश न्यायालयाने दिल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
दिशा सालियान यांचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी मॅनेजर होत्या. दिशांच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही घटनांबाबत त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.
मुंबई पोलिसांनी दिशांच्या मृत्यूची अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करून तपास केला होता. पोलिसांच्या तपासानुसार हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सतीश सालियान यांनी पोलिसांच्या निष्कर्षावर आक्षेप घेतला. आपल्या मुलीचा मृत्यू संशयास्पद असून तिची हत्या झाल्याचा आरोप करत त्यांनी नव्याने तपासाची मागणी केली.
पोलिसांच्या तपासावर न्यायालयाचे प्रश्न
याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने तपासाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले होते. कुटुंबीयांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त करून तक्रार केली असताना एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना केला होता.
तसेच, ADR आणि पोस्टमॉर्टम अहवालाची प्रत इतक्या वर्षांनंतरही कुटुंबीयांना का देण्यात आली नाही, याबाबतही न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले होते. दिशांचा चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा आणि पोस्टमॉर्टम अहवालातील जखमांची माहिती यामध्ये नेमका मेळ कसा बसतो, यावरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते.
आदित्य ठाकरेंच्या नावावरूनही युक्तिवाद
दरम्यान, या प्रकरणात आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना केवळ राजकीय हेतूने आपले नाव गोवले जात असल्याचा युक्तिवाद शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता.
सर्व पक्षकारांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आता तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या आदेशामुळे या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे.