Skip to content
Menu

तुकाराम मुंढेंच्या FDA ला पुन्हा न्यायालयाचा दणका; MCA च्या किचनवरील बंदी उठवली

August 29, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्यातील वादात MCAला मोठा दिलासा मिळाला आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील MCA क्लबच्या किचनवर FDAने केलेली कारवाई न्यायालयीन निर्णयामुळे मागे घ्यावी लागली आहे. किचनवरील बंदी तातडीने उठविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

FDAने २० ऑगस्ट रोजी MCA क्लबच्या किचनची तपासणी केली होती. या तपासणीत किचनला ११० पैकी ८७ गुण मिळाले होते. त्यानंतर FDAकडून २५ ऑगस्ट रोजी पुन्हा तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. २७ ऑगस्टला झालेल्या पुनर्तपासणीत किचनची कामगिरी सुधारून गुणांकन ९५ पर्यंत पोहोचले.

गुणांकनात सुधारणा झाल्यानंतरही किचनवरील कारवाई कायम राहिल्याने MCAने न्यायालयात धाव घेतली. सुनावणीदरम्यान समाधानकारक गुणांकन असताना बंदी कायम ठेवण्याच्या FDAच्या निर्णयावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर किचनवरील बंदी तातडीने हटविण्याचे निर्देश देण्यात आले.

MCAला दुसऱ्यांदा न्यायालयीन दिलासा

FDA आणि MCA यांच्यातील वादात न्यायालयाकडून MCAला मिळालेला हा दुसरा मोठा दिलासा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर MCA BKCचे अध्यक्ष अजय देसाई यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिष्ठित संस्थेवर अशा प्रकारची कारवाई का करण्यात आली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अखेर न्यायालयाने योग्य निर्णय दिल्याचेही त्यांनी म्हटले.

या निर्णयामुळे MCAला मोठा दिलासा मिळाला असून FDAच्या कारवाईविरोधातील कायदेशीर लढाईत MCAने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.