कोलकाता : तृणमूल काँग्रेसमधून फुटून NCPI या पक्षात गेलेल्या २० खासदारांच्या गटाला भाजपकडून मोठा धक्का बसला आहे. या गटाचे भाजपसोबत राजकीय समीकरण जुळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच कोलकाता महापालिका निवडणुकीत (KMC) भाजपने NCPIसोबत आघाडी करण्यास नकार दिला आहे.
या गटात सायोनी घोष, काकोली घोष दस्तीदार, सुदीप बंदोपाध्याय यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अन्य फुटीर खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी NCPIमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभेतील त्यांच्या गटाच्या विलीनीकरणाचा मुद्दाही चर्चेत आहे. मात्र, विलीनीकरणाला अधिकृत मंजुरी मिळण्यापूर्वीच भाजपने स्थानिक निवडणुकीत त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.
सुदीप बंदोपाध्यायांचा दावा, भाजपचा नकार
NCPIचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी बुधवारी दावा केला होता की, त्यांचा पक्ष NDAचा भाग असल्याने आगामी कोलकाता महापालिका निवडणूक भाजपसोबत मिळून लढवणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा झाली असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले होते.
मात्र, त्यांच्या या दाव्यानंतर काही तासांतच भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आले. KMC निवडणुकीची जबाबदारी असलेले केंद्रीय राज्यमंत्री सुकांत मुजुमदार यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले.
‘तृणमूलविरोधात वर्षानुवर्षे लढलो’
भाजपच्या एका नेत्याने NCPIसोबत निवडणूक आघाडी करण्याबाबत नाराजी व्यक्त केली. तृणमूल काँग्रेसमधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाजपने अनेक वर्षे संघर्ष केला आहे. त्यामुळे त्याच पक्षातून फुटलेल्या नेत्यांसोबत निवडणूक लढवणे योग्य ठरणार नाही, असे भाजपच्या नेत्याने म्हटले आहे.
NDAच्या संख्याबळावर परिणाम होणार?
तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याने लोकसभेतील राजकीय समीकरणांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या गटाच्या विलीनीकरणाला मंजुरी मिळाल्यास NDAच्या संख्याबळात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने स्थानिक निवडणुकीत NCPIला सोबत घेण्यास नकार दिल्याने या नव्या राजकीय समीकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, सायोनी घोष आणि युसूफ पठाण यांच्यासह २० खासदारांचा हा गट पुढील काळात कोणती भूमिका घेतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.