नेपाळमध्ये अचानक महापूर; ७ जणांचा मृत्यू, ४१ हून अधिक बेपत्ता
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४१ हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पुराचा थरकाप उडवणारा व्हिडिओही समोर आला आहे.
तिबेटमधून नेपाळमध्ये येणाऱ्या भोटेकोशी नदीची पाणीपातळी अचानक वाढल्याने नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्या असून काही जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने प्रशासनाने त्रिशूली नदीच्या खालच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पाऊस नसताना नदीला अचानक पूर
या महापुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रसुवा जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांच्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालय आणि आसपासच्या परिसरात पाऊस झालेला नव्हता. हवामानही स्वच्छ होते.
त्यामुळे पाऊस नसतानाही नदीला अचानक एवढा मोठा पूर कसा आला, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. वरच्या हिमालयीन भागातील एखादे हिमनदी तलाव फुटणे किंवा नदीच्या प्रवाहातील तात्पुरता अडथळा अचानक तुटणे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पुराचे निश्चित कारण अद्याप समोर आलेले नाही.
बाजारपेठा आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान
पुराचा वेग अत्यंत प्रचंड असल्याने नदीकाठच्या भागात मोठी हानी झाली. अनेक दुकाने आणि बाजारपेठा पाण्याखाली गेल्या. चिलिमे जलविद्युत प्रकल्पासह काही अन्य जलविद्युत प्रकल्पांनाही पुराचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नदीचा प्रवाह इतका वेगवान होता की काही क्षणांतच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
इतर जिल्ह्यांनाही पुराचा धोका
भोटेकोशी नदीतील पाण्याचा प्रवाह कायम असल्याने नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतील काही भागांनाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि परिस्थिती बिघडल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून प्रयत्न सुरू असून पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावाही घेतला जात आहे.