नेपाळ-नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेंद्र उर्फ बालेन शाह आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी भारताची निवड करण्याची शक्यता आहे. नेपाळचे अर्थमंत्री स्वर्णिम वागले यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बालेन शाह यांच्या भारत दौऱ्याचे नियोजन सुरू असून, यावर्षीच्या अखेरपर्यंत हा दौरा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिल्या परदेश दौऱ्याबाबत चर्चा सुरू
काठमांडूमध्ये आयोजित एका वृत्तसमूहाच्या शिखर परिषदेत बोलताना अर्थमंत्री स्वर्णिम वागले यांनी बालेन शाह यांच्या संभाव्य परदेश दौऱ्याबाबत माहिती दिली. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तारखांवर चर्चा सुरू असून, पहिला परदेश दौरा भारताचा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वागले म्हणाले की, पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारत दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली, तरी यावर्षाच्या अखेरपर्यंत बालेन शाह भारताला भेट देतील, अशी अपेक्षा आहे.
संकटाच्या काळात भारताची नेपाळला मदत
बालेन शाह यांच्या भारत दौऱ्याबाबतचे हे वक्तव्य नेपाळ गंभीर नैसर्गिक संकटाचा सामना करत असताना समोर आले आहे. नेपाळ-तिबेट सीमेवरील भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पुराच्या पाण्यासोबत आलेल्या गाळामुळे अनेक भागांतील रस्ते आणि पूल वाहून गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या संकटाच्या काळात भारताने नेपाळला तातडीने मदतीचा हात दिला आहे. भारतीय लष्करी विमानांच्या माध्यमातून सुरुवातीला सुमारे १० टन मानवतावादी मदत आणि बचाव साहित्य नेपाळमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर आणखी ३५.५ टन मदत सामग्रीची खेप रवाना करण्यात आली.
भारत नेपाळच्या जनतेसोबत ठामपणे उभा असून, आवश्यक ती सर्व मदत करण्यास भारत तयार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बालेन शाह यांच्या संभाव्य भारत दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.