Skip to content
Menu

सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत’

August 26, 2026
महाराष्ट्र,मुख्य बातम्या,राजकीय

 

अमरावती येथील जिल्हा स्त्री शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनासह राज्य सरकारच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि सरकारवर जोरदार टीका केली.

‘मी एक आई आहे, आईचं दुःख मी समजू शकते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि दोन आमदारांना घटनेची माहिती घेण्यासाठी पाठवलं आहे,’ असे अंधारे यांनी सांगितले.

फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट कुठे? अंधारेंचा सवाल

अंधारे यांनी सांगितले की, गेल्या दोन तासांपासून चौकशी समितीतील अधिकाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्यांना अद्याप फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिटची माहिती मिळालेली नाही.

‘अशी दुर्घटना घडू शकते, याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना होती, तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रुग्णालयातील स्थानिक पद्धतीने करण्यात आलेले वायरिंग आगीच्या दुर्घटनेमागचे कारण असू शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

बावनकुळेंवरही निशाणा

या घटनेवरून सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार टीका केली. ‘मुख्यमंत्री तर सोडाच, भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही अमरावतीत फिरकले नाहीत,’ असा टोला त्यांनी लगावला.

बावनकुळे सध्या राजस्थानमध्ये असून तेथे पाणीपुरी खात असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याचा दावा करत अंधारेंनी सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

भंडारा घटनेचा दिला दाखला

यावेळी अंधारे यांनी भंडारा येथील रुग्णालयातील आगीच्या घटनेचाही संदर्भ दिला. त्या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन चार अधिकाऱ्यांना निलंबित केले होते, असे त्यांनी सांगितले.

अमरावतीतील दुर्घटनेप्रकरणीही जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

व्हेंटिलेटर पुरवठ्यावरही प्रश्न

रुग्णालयात ‘शिलर’ कंपनीचे व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या व्यक्तीचे सरकारमधील काही व्यक्तींशी संबंध आहेत का, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांना आमदार नितीन देशमुख यांनी फोन करून जाब विचारल्याची माहितीही अंधारे यांनी दिली.