Skip to content
Menu

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा देशाला संदेश

August 14, 2026
देश-विदेश,मुख्य बातम्या

नवी दिल्ली :- १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये फाळणीचे स्मरण करत हा दिवस आपल्या राष्ट्रातील सलोखा व बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो आणि ‘विकसित भारत’ घडवण्याच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून कार्य करावे असे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, आज आपण फाळणीच्या भीषणतेचा स्मरण दिवस पाळत आहोत. फाळणीचा फटका बसलेल्या त्या सर्वांच्या धैर्याचे आपण स्मरण करतो. इतिहासातील तो एक असा क्षण होता ज्याने अनेक आयुष्ये उद्ध्वस्त केली. कुटुंबे विस्थापित झाली, आप्तेष्ट हिरावले गेले आणि असीम वेदना सोसाव्या लागल्या. त्याच वेळी, या परिस्थितीवर मात करून लोकांनी शून्यातून आपले आयुष्य पुन्हा उभे केले, संकटांचे यशात रूपांतर केले आणि देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दरम्यान, भारत १४ ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृति दिवस पाळतो. १९४७ च्या फाळणीदरम्यान ज्यांनी आपले प्राण गमावले आणि अकल्पनीय यातना सहन केल्या, त्या सर्वांना देश आदरांजली वाहत आहे. १९४७ मध्ये भारताला स्वातंर्त्य मिळाल्याच्या वेळी, देशाच्या मोठ्या भागाला फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या. फाळणीनंतर पंजाब आणि बंगाल (पाकिस्तान) च्या विभागलेल्या भागांमध्ये आपले सर्वस्व मागे सोडून लाखो लोकांनी स्वतंत्र भारतात आसरा घेतला.

विकसित भारतासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे
हा दिवस आपल्या राष्ट्रातील सलोखा व बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करो आणि विकसित भारत घडवण्याच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून कार्य करावे, हीच सदिच्छा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.