नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण व होमगार्ड तसेच सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्तव्य बजावताना धाडस दाखवत नागरिकांचे प्राण व मालमत्ता वाचविणे, गुन्हेगारीविरोधात प्रभावी कारवाई करणे किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत ३०१ शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी २७२ पदके पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना, तर २९ पदके अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदक मिळाले आहे.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक
विशेष उल्लेखनीय आणि प्रदीर्घ सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती पदक (विशिष्ट सेवा) श्रेणीत देशभरातील ९२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. यामध्ये ८३ पोलीस, ४ अग्निशमन, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना या प्रतिष्ठेच्या पदकाने गौरविण्यात आले आहे.
गुणवत्तापूर्ण सेवेलाही सलाम
कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमतेने बजावलेली जबाबदारी, समर्पण आणि सातत्यपूर्ण उल्लेखनीय सेवेसाठी देशभरात ६६४ गुणवत्तापूर्ण सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ६०६ पोलीस, २८ अग्निशमन, १८ नागरी संरक्षण व होमगार्ड आणि १२ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील ३७ पोलीस कर्मचारी, २ अग्निशमन कर्मचारी, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील पदकविजेत्यांचा गौरव
शौर्य पोलीस सेवा पदक (GM)
राजू पांडुरंग गवळी, वासुदेव राजम मडावी, दिलीप विठ्ठल आत्राम, अजय गोपाळराव मडावी, गणेश चंद्रम दुब्बुला, विजय झरू मडावी, भूपेश मारोतराव जुनमाके, दलसू कटिया बोगामी, राजेश शामराव किरांगे, मसा बोरा अत्राम, यतिश विजयराव देशमुख, विजय किश्तय्या कोडपे, दशरथ रामशहा मडावी, राकेश राजम बेडकी, सुधाकर जगन पोर्टे, श्रीनिवास समय्या निष्टुरी, गणेश हनमंतु गजीवार, नितेश प्रभुदास टेंबेकर, शिवाजी मेस्सो हिचामी आणि संजय मल्लेश कंकाबंदवार.
शौर्य अग्निशमन सेवा पदक
मनोज विश्वनाथ सावंत, रवींद्र नारायणराव आंबुलेकर, अनिल वसंत परब, ईश्वर खंडू कांबळे, योगेश हिरालाल पवार, दत्तात्रय अशोक भोसले, महेश आनंद गुदलकर, चिंतामणी शिवाजी खांडेकर, विकी नागेश सरवदे, दर्शन घनश्याम पावडे, रमेश जीवन कोळी, राजेश विष्णू राणे आणि हर्षल शंकर कटके.
राष्ट्रपती पदक (विशिष्ट सेवा)
पोलीस सेवेत शिरीष रवींद्र जैन, सुभाष नानासाहेब भुजंग आणि संजय राजाराम वायचळे यांचा समावेश आहे. सुधारात्मक सेवेत संजीव सखाराम घाणेकर आणि संजय राजारामजी तलवारे यांना पदक जाहीर झाले आहे.
गुणवत्तापूर्ण सेवा पदक (MSM)
पोलीस सेवेत संजय बाजीराव जाधव, विजयकुमार गोपीनाथ मगर, दिगंबर पांडुरंग प्रधान, प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी, भागीरथ शिवाजी देशमुख, प्रवीण विनायक तेजाळे, मनोजकुमार माधवराव यादव यांच्यासह एकूण ३७ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अग्निशमन सेवेत शंकर उत्तम मिसाळ आणि शैलेश महादेव जगताप, तर नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेत पोपट रामजी सांगदे, अशोक नामदेव इंगळे आणि मनोज सदाशिव बरसागडे यांना गौरविण्यात आले आहे. सुधारात्मक सेवेत विकास हनमंतू राजनळवार आणि महेश लक्ष्मण गडनाईक यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झाले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या पदकांमुळे देशाच्या सुरक्षेसाठी, नागरिकांच्या संरक्षणासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत अहोरात्र सेवा बजावणाऱ्या खाकी वर्दीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय स्तरावर सलाम करण्यात आला आहे.