Skip to content
Menu

सीजीपी आंदोलनातील फेक न्यूजवर महाराष्ट्र सायबरची नजर; १४०हून अधिक पोस्टमध्ये एआयचा वापर झाल्याचा संशय;

August 17, 2026
महाराष्ट्र

सीजीपी आंदोलनातील फेक न्यूजवर महाराष्ट्र सायबरची नजर;
१४०हून अधिक पोस्टमध्ये एआयचा वापर झाल्याचा संशय

मुंबई : सीजीपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आलेल्या कथित फेक न्यूज, दिशाभूल करणारे व्हिडिओ आणि एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या किंवा फेरफार केलेल्या कंटेंटचा तपास महाराष्ट्र सायबरकडून सुरू आहे. आंदोलनाबाबत चुकीची माहिती पसरवून वातावरणावर परिणाम करण्याचा प्रयत्न झाला आहे का, याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील विविध पोस्ट आणि खात्यांची तांत्रिक पद्धतीने तपासणी केली जात आहे.

आतापर्यंत इन्स्टाग्राम, एक्स, फेसबुक आणि यूट्यूबवर तब्बल ४२९ आक्षेपार्ह पोस्ट आणि हँडल्स महाराष्ट्र सायबरच्या रडारवर आले आहेत. यापैकी १४०हून अधिक पोस्ट आणि प्रोफाइलमध्ये एआय-जनरेटेड किंवा एआयच्या मदतीने तयार केलेला कंटेंट वापरण्यात आल्याचे प्राथमिक तांत्रिक तपासात आढळून आले आहे. याशिवाय, ५००हून अधिक सोशल मीडिया प्रोफाइलचा विविध अंगांनी तपास केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास
अतिरिक्त पोलीस महासंचालक (राज्य सायबर) यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सायबरचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. सोशल मीडिया कंटेंटची छाननी करताना ओपन-सोर्स इंटेलिजन्स, मेटाडेटा तपासणी आणि संबंधित खात्यांच्या ऑनलाइन वर्तनाचे विश्लेषण केले जात आहे.

एआयच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या किंवा बदललेल्या व्हिडिओंची ओळख पटवण्यासाठी फॉरेन्सिक पद्धतीनेही तपास सुरू आहे. एखादी पोस्ट नेमकी कुठून तयार झाली, ती कोणत्या खात्यांमधून प्रसारित झाली आणि त्यामागे एकच नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

आवाज आणि व्हिडिओमध्ये फेरफार
तपासादरम्यान काही पोस्टमध्ये आंदोलनातील गर्दी प्रत्यक्षापेक्षा मोठी असल्याचे भासवण्यासाठी डिजिटल पद्धतीने फेरफार केल्याचे आढळले आहे. काही व्हिडिओंमध्ये कृत्रिम आवाजाचा वापर, ऑडिओ क्लोनिंग तसेच सार्वजनिक व्यक्तींच्या नावाने फेरफार केलेले व्हिडिओ प्रसारित केल्याचेही समोर आले आहे.

अशा प्रकारच्या कंटेंटमुळे आंदोलनाचे चुकीचे चित्र लोकांसमोर जाण्याची आणि त्यातून जनतेची दिशाभूल होण्याची शक्यता तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

परदेशातून चालवल्या जाणाऱ्या खात्यांचाही संशय
महाराष्ट्र सायबरच्या तपासात काही सोशल मीडिया खाती भारताबाहेरून चालवली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अशा सुमारे १०० खात्यांची स्वतंत्रपणे छाननी केली जात आहे. या खात्यांचे परस्पर संबंध, पोस्ट करण्याची पद्धत आणि कंटेंट प्रसारित करण्याची वेळ यांचा अभ्यास करण्यात येत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरून पसरवण्यात आलेल्या प्रत्येक पोस्टचा थेट निष्कर्ष काढण्याऐवजी तांत्रिक पुरावे आणि डिजिटल फॉरेन्सिक तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे या तपासातून नेमके कोणते नेटवर्क किंवा व्यक्ती समोर येतात, याकडे आता लक्ष लागले आहे.