पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार गेल्या काही काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत ते राज्यातील वेगवेगळ्या भागांचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधत आहेत. मात्र, त्यांच्या या कामाची आणि भूमिकेची पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर पुरेशी दखल घेतली जात नसल्याची नाराजी आता पक्षातील काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
रोहित पवार हे शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. दौऱ्यांदरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत ते सरकारच्या धोरणांवरही टीका करत आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यांबाबत आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट केल्या जात नसल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे.
याच मुद्द्यावरून सोशल मीडियावर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सोशल मीडिया उपाध्यक्ष योगेश सावंत यांनी केलेल्या एका पोस्टमुळे या नाराजीला अधिक वाचा फुटली आहे. सावंत यांनी आपल्या पोस्टमधून पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
योगेश सावंत यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमदार रोहितदादा पवार गेल्या अनेक काळापासून शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी ठामपणे लढत आहेत. त्यामुळे या घटकांमधील अनेकांना रोहित पवार हे आपला आवाज वाटत आहेत. ते सातत्याने या प्रश्नांवर भूमिका मांडत असताना पक्षाच्या सोशल मीडिया पेजवर त्याची माहिती किंवा पोस्ट प्रसिद्ध होत नसेल, तर पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या नात्याने आपल्याला याचे दुःख होत असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
सावंत यांच्या या पोस्टनंतर पक्षाच्या सोशल मीडिया टीमच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवार यांच्या कामाची आणि त्यांच्या आंदोलनांची पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवर योग्य पद्धतीने दखल घेतली जाते का, असा सवालही काही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.