पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पुण्यात मोठी कारवाई केली. बुधवार पेठ परिसरात केलेल्या तपासणीत पनीर आणि खव्याने भरलेले तब्बल चार ट्रक जप्त करण्यात आले. मोठ्या प्रमाणात साठा आढळल्याने प्रशासनाच्या कारवाईची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवार पेठ परिसरात धडक तपासणी केली. यावेळी चार ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात पनीर आणि खव्याचा साठा आढळून आला. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून, त्यातील खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
जप्त केलेल्या पनीर आणि खव्याची गुणवत्ता तसेच हा साठा नेमका कुठून आणण्यात आला, याबाबतही प्रशासनाकडून तपास केला जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात येऊ नयेत, यासाठी FDA कडून विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे.
नाशिकमध्येही FDA ची कारवाई
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोरेज अँड एक्सपोर्ट या ठिकाणी तपासणी करण्यात आली.
येथे फ्रोजन कस्टर्ड ॲपल पल्प, मँगो पल्प आणि क्रीमर असा एकूण ६,४५७ किलो साठा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत ३९ लाख १८ हजार ५२० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या खाद्यपदार्थांच्या लेबलवर ‘Use by Date’, पोषणमूल्यांची माहिती, पॅकिंगची तारीख तसेच FSSAI परवाना क्रमांक आढळून आला नाही. त्यामुळे संबंधित पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
महाप्रसाद, भंडाऱ्यांसाठीही FDA च्या सूचना
सण-उत्सवांच्या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या महाप्रसाद, अन्नछत्र, लंगर आणि भंडाऱ्यांमध्ये अन्नाची सुरक्षितता आणि स्वच्छता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
अशा सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमांची किमान सात दिवस आधी पूर्वसूचना प्रशासनाकडे देणे आवश्यक राहणार आहे. परवानाधारक किंवा नोंदणीकृत केटरर अथवा स्वयंपाकगृहामार्फत अन्न तयार करून वितरित केले जाणार असल्यास विहित नमुन्यात पूर्वसूचना सादर करावी लागणार आहे.
कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षित पाण्याचा वापर, अन्नाचे योग्य तापमान राखणे, कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे, अन्न हाताळणाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता तसेच खाद्यपदार्थांची सुरक्षित साठवणूक याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.