अयोध्या : रामजन्मभूमी परिसरात शुक्रवारी दुपारी पीएनजी गॅसची पाइपलाइन फुटल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. गॅस गळतीची माहिती मिळताच सुरक्षेच्या दृष्टीने रामललांसह परिसरातील अन्य मंदिरांमधील दर्शन सुमारे पाऊण तासासाठी थांबवण्यात आले. दरम्यान, तातडीने दुरुस्तीचे काम करून गॅस गळती रोखण्यात आली आणि त्यानंतर दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरात अचानक गॅसचा तीव्र वास येऊ लागला. सुरक्षारक्षकांनी तातडीने परिसराची पाहणी केली असता, कुबेर टिल्लाकडे जाणाऱ्या मार्गाजवळ जेसीबीच्या माध्यमातून सुरू असलेल्या खोदकामादरम्यान पीएनजीची पाइपलाइन फुटल्याचे निदर्शनास आले.
ही पाइपलाइन ‘ग्रीन गॅस लिमिटेड’ची असून, तिच्यामधून राम मंदिरातील ‘सीता रसोई’साठी पीएनजीचा पुरवठा केला जातो. याच ठिकाणी रामललांच्या प्रसादाची तयारी केली जाते.
गळतीची माहिती मिळताच दर्शन थांबवले
गॅस गळतीची माहिती मिळताच प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दर्शन तात्पुरते बंद केले. त्यानंतर ‘ग्रीन गॅस लिमिटेड’च्या तंत्रज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तंत्रज्ञांनी तातडीने पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेत गळती रोखली.
ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी कॅप्टन के. के. तिवारी यांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १.३० वाजता गॅस गळती पूर्णपणे थांबवण्यात आली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री करून भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून काही काळ दर्शन थांबवण्यात आले होते.