४० ते ५० फूट खाली कोसळली कार; दोन जण गंभीर जखमी, पहाटे साडेपाचच्या सुमारास दुर्घटना
मुंबई : मुंबईतील कोस्टल रोडवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात BMW कार पुलावरून सुमारे ४० ते ५० फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास लाला लजपतराय महाविद्यालयासमोर, लोटस जेटीजवळ ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, BMW कार वरळी-मरीन ड्राईव्हकडून हाजीअलीच्या दिशेने जात होती. भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती प्रथम रेलिंगला धडकली. त्यानंतर लाईटचा खांब आणि बोर्डला धडक देत कार पुलावरून खाली कोसळली. अपघातात कारचा मोठ्या प्रमाणात चेंदामेंदा झाला.
अपघातानंतर जखमींना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शानय गज्जल (वय २१), धिर्या सेठ (वय १७) आणि २५ वर्षीय एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. २० वर्षीय तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर ट्रॉमा वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. आदित्य ओस्वाल याच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, प्राथमिक तपासात ही BMW कार सिल्वासाची असल्याचे समोर आले आहे. कारमधील तरुण-तरुणी गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी असून मुंबईत शिक्षणासाठी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मृतांपैकी एक जण आर्किटेक्चर, तर दुसरा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता.
अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता, तसेच दुर्घटनेचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून घटनास्थळी पंचनामा आणि फॉरेन्सिक तपास करण्यात येत आहे. कारमधील व्यक्तींनी मद्यपान केले होते का, याचाही तपास केला जात आहे.
पहाटेची वेळ असल्याने अपघाताची माहिती काही वेळाने समोर आली. त्यामुळे जखमींना रुग्णालयात नेण्यात काहीसा विलंब झाल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर कोस्टल रोडवरील वेगमर्यादा आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.