मुंबई : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या चाहत्यांची उत्सुकता आता बॉक्स ऑफिसवरील कमाईतही दिसून येत आहे. ‘मिर्झापूर द मुव्ही’ने प्रदर्शनानंतर अवघ्या तीन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ९३.७५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या गँगस्टर ड्रामाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुरमीत सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर मजबूत पकड निर्माण केली आहे.
पहिल्या दिवसापासून कमाईचा वेग कायम
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीसारख्या भागांत अॅक्शनपटांना मिळणारा प्रतिसाद ‘मिर्झापूर द मुव्ही’च्या कमाईतही दिसून आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने सुमारे २५.७५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली.
दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. शनिवारी सुमारे ३२ कोटी रुपयांचा गल्ला जमवत दोन दिवसांची एकूण कमाई ५७.७५ कोटी रुपयांवर पोहोचली.
रविवारीही चित्रपटाने जोरदार कामगिरी केली. तिसऱ्या दिवशी सुमारे ३६ कोटी रुपयांची कमाई झाल्याने भारतातील तीन दिवसांची एकूण निव्वळ कमाई ९३.७५ कोटी रुपये झाली आहे.
जगभरात १३२ कोटींचा टप्पा
देशांतर्गत बॉक्स ऑफिससोबतच परदेशातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी परदेशातून सुमारे ७ कोटी रुपयांची कमाई झाल्याने ‘मिर्झापूर द मुव्ही’ची तीन दिवसांची जगभरातील एकूण कमाई १३२.३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
या चित्रपटाचे देशभरात ११ हजारांहून अधिक शो सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्याच वीकेंडमध्ये ९० कोटींहून अधिक रुपयांची निव्वळ कमाई करणे हिंदी चित्रपटासाठी मोठी कामगिरी मानली जाते.
‘अल्फा’च्या कमाईलाही मागे टाकले
या दमदार सुरुवातीमुळे ‘मिर्झापूर द मुव्ही’ने अलीकडे प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपटांच्या एकूण कमाईचा आकडाही मागे टाकला आहे. आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘अल्फा’ची एकूण कमाई सुमारे ६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
फरहान अख्तर यांची निर्मिती
‘मिर्झापूर : द मुव्ही’ हा चित्रपट ॲमेझॉन एमजीएम स्टुडिओज आणि एक्सेल एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सादर करण्यात आला आहे. गुरमीत सिंग यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून पुनीत कृष्ण यांनी लेखन केले आहे.
एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. कासिम जगमगिया आणि विशाल रामचंद्रानी हे सह-निर्माते आहेत.